सुपे उपबाजारात बाजरीची उच्चांकी आवक
सुपे उपबाजारात बाजरीची उच्चांकी आवक
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सुपे उपबाजार आवारात बुधवार दि.८/१०/२०२५ रोजी बाजरीची २९२० पोत्याची उच्चांकी आवक झाली. जादा आवक होऊन बाजरीस प्रति क्विंटल रू. ३२००/- असा दर मिळाला तर बाजरीचे सरासरी भाव रू. २८५०/- निघाले. तर गुरूवारी मुख्य बाजार आवारात १२८० नगाची आवक होऊन कमाल दर प्रति क्विंटल रू. ३५०० असा मिळाला. बाजरीस किमान दर रू.२२०० तर सरासरी रू.३००० असे बाजारभाव निघाले. तर आठवड्यात एकुण ४२०० पोत्यांची आवक झाली. चालु वर्षी समाधानकारक पाऊस आणि हवामान पोषक असल्याने बाजरीचे उत्पन्न वाढले आहे. चांगले दर मिळत असल्याने शेतक-यांनी शेतमाल स्वच्छ व वाळवुन आणावा, ज्यामुळे आणखी जादा दर मिळतील. शेतक-यांनी आपला शेतमाल बाजार आवारात विक्री करावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.
बाजरीची आवक बारामती तालुक्यातुन तसेच शिरूर, दौंड, पुरंदर निरा, जेजुरी, मोरगाव या परिसरातुन येत आहे. बाजरीस जादा दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक व बाहेरील पेठेतील खरेदीदार येत असल्याने मागणी वाढली आहे. बारामती बाजार समितीने पुरविलेल्या विविध सुविधा आणि समितीची विश्वासर्हता व नावलौकीक तसेच शेतमालाचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटावर लिलावपुर्वी अचुक वजन, त्याच दिवशी पट्टी, कोणतीही कपात नाही अशामुळेच शेतकरी विश्वासाने बाजार आवारात येत आहेत. भविष्यात शेतकरी व बाजार घटकांना आणखी सुविधा पुरविणेचा समितीचा मानस असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.