देशभक्तीच्या दिवशी नियमभंगाविरुद्ध बारामती वाहतूक पोलिसांची धडक मोहीम*
*देशभक्तीच्या दिवशी नियमभंगाविरुद्ध वाहतूक पोलिसांची धडक मोहीम*
_१७ वाहनांवर दंडात्मक कारवाई; १२ अल्पवयीन मुलांचा समावेश_
बारामती दि.१५ स्वातंत्र्य दिनाच्या देशभक्तीच्या उत्सवात काही तरुणांनी देशभक्तीपेक्षा 'दणका' आणि 'थाट' दाखवण्याचा प्रयत्न केला. बुलेटवर कानठळ्या बसवणारे सायलेंसर, स्पोर्ट्स बाईकचा अति वेग, ट्रिपल सीट मस्ती आणि वेडीवाकडी वाहने चालवून सुसाट गाडी पळवण्याचा रोडशो त्यांनी शाळा-काॅलेजच्या रस्त्यांवर उभा केला. मात्र बारामती वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या सजगतेसमोर त्यांचा हा 'रोडशो' काही क्षणात थंडावला.
एम.ई.एस.शाळा, बालविकास शाळा, देशपांडे शाळा, टेक्निकल हायस्कूल, अनेकांत शाळा या परिसरात सकाळपासूनच उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वाहतूक शाखेची विशेष पथके तैनात केली. या पथकांनी अभ्यासपूर्वक नाकाबंदी केली. काही वाहने पकडण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्ष पाठलाग केला. ट्रिपल सीट बसून, मोठा आवाज करत, अति वेगाने व झिगझॅग वाहन चालवणाऱ्यांना थेट जागीच थांबवून दंड ठोठावला. आजच्या मोहिमेत एकूण १७ वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली. त्यात ९ बुलेट, १ यामाहा, १ केटीएम, १ रायडर व इतर वाहनांचा समावेश आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, यात १२ अल्पवयीन मुले वाहन चालवत असल्याचे आढळले. बदललेले सायलेंसर, कानठळ्या बसवणारे आवाज, ट्रिपल सीट व धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांची 'दादागिरी' वाहतूक पोलिसांनी एका दिवसातच उतरवली. यापूर्वी २६ जानेवारीलाही अशाच प्रकारे १२ वाहनांवर कारवाई झाली होती. पुढच्यावेळी अशी मस्ती दिसली तर केवळ दंड नाही, तर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव उपनिरीक्षक सुभाष काळे, वाहतूक पोलीस जेवण प्रदीप काळे, दत्तात्रय भोसले, आकाश कांबळे, माया निगडे, रेश्मा काळे, रूपाली जमदाडे, प्रज्योत चव्हाण, स्वाती काजळे, अजिंक्य कदम, आशा शिरतोडे, योगेश कुंभार, सुनीता ढेंबरे, योगेश कातवारे, योगेश कुंभार, राहुल मदने यांनी केली आहे.
उत्सव आपल्या सर्वांचा आहे, तो नियमांच्या चौकटीतच असायला हवा. मोठा आवाज, अतिवेग, ट्रिपल सीट किंवा अल्पवयीनांकडून वाहन चालवणे हे केवळ बेकायदेशीर नाही, तर जीवघेणं आणि गंभीर आहे. अशा प्रकारांवर पोलिस लक्ष ठेऊन आहेत. आजची कारवाई त्याचाच भाग असून, पुढच्यावेळी आणखी गंभीर कारवाई केली जाईल.असे 'चंद्रशेखर यादव, वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे