प्रवासात प्रवाशांचा आणि स्वतःचा जीव महत्त्वाचा-वाहतूक पोलीस निरीक्षक यादव.
रिक्षा चालक आणि विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती*
अपघात टाळण्यासाठी बारामती वाहतूक शाखा व हार्मोनी इन्स्टिट्यूटचा संयुक्त उपक्रम_
बारामती दि.१८:- बारामती वाहतूक शाखा आणि हार्मोनी इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन सोल्युशन्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती शहरात 'रस्ता सुरक्षा जनजागृती' कार्यक्रम पार पडला.
रिक्षा चालक आणि विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी दोन सत्रांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात वाहतुकीशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय समजावून सांगण्यात आले. रिक्षा चालकांसाठी बसस्थानकात झालेल्या सत्रात अपघाताची कारणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, वाहनाची रचना आणि देखभाल, अग्निशमन यंत्राचा उपयोग, भारवाहन क्षमता आणि सीएनजी टाकीची तपासणी या मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी विद्या प्रतिष्ठान संस्थेत झालेल्या सत्रात दुचाकी चालवताना मोबाईल वापराचे दुष्परिणाम, अपघाताचे विश्लेषण, शरीरातील नाजूक अवयवांवरील परिणाम, वाहन चालवताना जबाबदारी, वेग नियंत्रण, निर्णय क्षमतेचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. वाहतूक विभागाचे प्रमुख चंद्रशेखर यादव यांनी रिक्षा चालकांच्या अडचणी समजावून घेत त्यांना सुरक्षिततेचे आवाहन केले.त्यांना काळे व कदम यांनी मोलाचे सहकार्य केले.
हार्मोनी इन्स्टिट्यूटचे मनोज कांबळे, आकाश सूर्यवंशी, अतिश झरापकर आणि बिरेन तांक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाबरोबरच अपघाताच्या मालिकांच्या कारणांची प्रत्यक्षिते दाखवून रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा बाबत जागरूकता वाढवणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. हा आगळावेगळा उपक्रम प्रथमच झाल्याने सर्वांनी भरभरून प्रतिसाद देत कौतुक केले. वाहतूक शाखा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय परिषदारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी राबवत असलेले अनेक उपक्रम सुरक्षिततेचे महत्वपुर्ण कार्य करत आहे.यावेळी वाहतूक शाखेचे सुभाष काळे प्रदीप काळे प्रज्योत चव्हाण अजिंक्य कदम हे उपस्थित होते.
*वाहन चालकाला मिळावी सन्मानाची वागणूक!*
शासकीय कार्यालयातील अनेक पदांच्या नावात बदल करून त्यांचा अधिक सन्मान कसा वाढेल? या दृष्टीने पाऊले टाकण्यात आली आहेत. वाहन चालकालाही 'ड्रायव्हर' असे संबोधित न करता रस्ता वीर, रस्ता योद्धा, रस्ता मार्गदर्शक, वाहन सेवक, ट्रॅव्हल गाईड, व्हॅन कॅप्टन, प्रवास दूत, वाहन मित्र, रस्ता मित्र, रोड मास्टर अशा नावाने संबोधित करून सन्मानाची वागणूक द्यावी. असे आवाहन चंद्रशेखर यादव यांनी केले