बारामतीत पादचाऱ्यांसाठी बांधलेल्या फुटपाथवरून गाड्या चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई..!
बारामतीत पादचाऱ्यांसाठी बांधलेल्या फुटपाथवरून गाड्या चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई..!
पोलीस निरीक्षक ऍक्शन मोडवर;
वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई सुरु
बारामती दि.०२बारामती शहरातील पादचाऱ्यांसाठी बांधलेल्या फुटपाथचा गैरवापर करणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा दंड भरावा लागणार आहे.याबाबत वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव ऍक्शन मोडवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनांनुसार, वाहतूक पोलिसांनी आता कठोर कारवाई सुरू केली आहे.
भिगवण रोड आणि विद्या प्रतिष्ठान परिसरात पादचाऱ्यांसाठी प्रशस्त, सुशोभित फुटपाथ बांधण्यात आले आहेत मात्र, काही वाहनचालक आपली सोय बघत थेट फुटपाथवर गाड्या घालतात आणि पार्किंगसाठी याचा गैरवापर करतात. यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षित मार्गाचा वापर करता येत नाही.ही बाब गांभीर्याने घेत वाहतूक पोलिसांनी अशा बेजबाबदार वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवली. आतापर्यंत १७ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बारामतीत येणाऱ्या हजारो वाहनांना वाहतूक नियमावलीचे धडे देण्यासाठी बारामती वाहतूक शाखेने आत्तापर्यंत अनेक नवनवीन संकल्पना आणि उपाययोजना राबवल्या आहेत. मात्र तरीही काही नागरिक आणि वाहनचालक आपली जबाबदारी झटकून टाकतात. आपल्या शहराला शिस्तबद्ध आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. इथून पुढच्या काळातही ही मोहीम अधिक कडक केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान सुभाष काळे प्रदीप काळे अजिंक्य कदम प्रज्योत चव्हाण रेशमा काळे सीमा साबळे यांनी केली आहे.
फुटपाथवर वाहन चालवत असेल किंवा वाहन पार्क करत असेल,तर अशांवर होणार कडक कारवाई
फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी आहे, गाड्यांसाठी नव्हे, जर कोणी फुटपाथवर वाहन चालवत असेल किंवा वाहन पार्क करत असेल, तर नागरिकांनी तातडीने ९९२३६३०६५२ या क्रमांकावर कळवा. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.